
पाचोरा प्रतिनिधी शेख जावीद
येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल भाजपा साठी मोठे धक्कादायक ठरले आहेत पाचोरा नगरपरिषदेवर आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे २८ पैकी २२ नगरसेवक निवडून आले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी देखील आमदारांच्या पत्नी सौ सुनिता किशोर पाटील या देखील ११३४८ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.पाचोरा नगरपरिषद निवडणूकीत भाजपाने मोठी ताकद लावली होती. ना. गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगांव चे आमदार मंगेश चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असताना देखील आमदार किशोर अप्पा पाटील यांनी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे.भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुचेता दिलीप वाघ यांचा तब्बल साडेअकरा हजार मतांनी पराभव करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सौ सुनिता पाटील या नगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्या आहेत.मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या प्रभागातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आल्या त्यात माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुत्र भुषण वाघ यांचा नऊशे मतांनी पराभव झाला. माजी आमदार यांच्या होमवार्डातच मुलाचा पराभव झाला आणि तेथूनच भाजपा उमेदवारापेक्षा शिंदे शिवसेना गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आघाडीवर गेल्या आणि पहिल्या प्रभावापासून शेवटच्या प्रभागाप्रर्यंत त्यांनी आघाडी घेत जवळपास तब्बल साडेअकरा हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत नगरपरिषदेवर आपली सत्ता व मजबूत पकड बसवली आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये किशोर बारवकर यांनी विजयी सुरूवात केली. या ठिकाणच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. तर प्रभाग दोन मधील देखील दोन्ही जागा शिवसेनेच्या निवडून आल्या. प्रभाग तीन मध्ये एक शिवसेना व एक भाजपाची जागा तर चार,पाच, सहा,सात,आठ,नऊ या प्रभागातील सर्व जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग दहा मध्ये अटीतटीच्या लढतीत एक भाजपा व एक शिवसेना तसेच प्रभाग अकराच्या दोन्ही जागा भाजपला मिळाल्या. प्रभाग बारा व चौदाच्या चारही जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग तेरा मध्ये भाजपाच्या दोन्ही जागा विजयी झाल्या.शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, चे खाते देखील उघडले नाही.
शहराचा विकास आणि स्थीर नेतृत्व हे प्रमुख मुद्दे या विजयासाठी महत्वाचे ठरले आहेत.
बऱ्याच प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर जुन्यांना नाकारले आहे. माजी नगरसेवकांमध्ये सतीश शिंदे,राम केसवाणी, भुषण वाघ, वासुदेव महाजन यांचा पराभव झाला आहे.







