
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
फैजपूर महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून आदिवासी शेतकऱ्यांच्या ताब्यातील शेतजमिनीवर “आदिवासी खातेदार – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ३६ व ३६अ नुसार पात्र” अशी आवश्यक नोंद घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार गेल्या काही महिन्यांपासून समोर आला आहे.
या प्रकरणी तलाठी तांदलवाडी व मंडळ अधिकारी खानापूर यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. फैजपूर विभागातील टोकरे कोळी जमातीच्या आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार श्री. अमोल जावळे यांच्याकडे मांडल्या होत्या.
तक्रारींच्या आधारे तसेच प्राथमिक माहितीची पडताळणी करून, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींचे संरक्षण व्हावे या उद्देशाने आ. श्री. अमोल जावळे यांनी विविध शासन निर्णय, सरकारी आदेश व न्यायनिर्णयांचा संदर्भ देत सविस्तर निवेदन तयार केले.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या दि. १४ डिसेंबर रोजी संपलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. श्री. अमोल जावळे यांनी महसूल मंत्री आ. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सादर केले.
आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींवर कायदेशीर नोंदी न लावल्यामुळे शासकीय योजना, कर्जप्रकरणे व जमीन व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र आदिवासी शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर तात्काळ आदिवासी नोंद लावण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. श्री. अमोल जावळे यांनी लक्षवेधी सूचना देखील सादर केली आहे. आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







