
उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
साकळी येथील थोर सूफी संत हजरत कुतुब सजनशाह वली रहेमतुल्लाअलै यांच्या पावन संदलनिमित्त संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पहाटेपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांची अभूतपूर्व गर्दी उसळली असून, श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे दर्शन सर्वत्र घडत आहे.
संदल मिरवणुकीस प्रारंभ होताच ढोल-ताशांचा निनाद, फुलांची उधळण, अगरबत्तीचा सुगंध आणि “या सजनशाह बाबा”च्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले. गावासह पंचक्रोशीतीलच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. बाबांच्या दर्ग्यावर चादर, फुले अर्पण करून मनोकामना व्यक्त करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
हिंदू–मुस्लीम ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेला हा उर्स सोहळा साकळीच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवतो. सर्वधर्मीय भाविकांनी एकत्र येत दर्शन घेतले, सेवा-कार्यांत सहभाग नोंदवला. लंगर, पाणीवाटप, स्वच्छता आदी व्यवस्था स्वयंसेवकांनी चोखपणे पार पाडल्या.
भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. चोख बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या पार पडत आहे. ग्रामस्थ, उर्स कमिटी व स्वयंसेवकांचे समन्वय विशेष लक्षवेधी ठरले.
संदलनंतर उर्स सोहळ्याच्या पुढील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, साकळी पुन्हा एकदा श्रद्धा, भक्ती आणि बंधुभावाच्या प्रकाशात उजळून निघाली आहे.







