
अन्यथा शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळीत करणार तीव्र रास्ता रोको आंदोलन….!
अहिल्यानगर/प्रशांत बाफना शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी येथे शासकीय हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी सी.सी.आय. ( भारतीय कपास निगम लिमिटेड ) कापूस खरेदी केंद्र किंवा फेडरेशन तातडीने चालू करावे अशी मागणी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळीसह बोधेगाव, सुकळी, शेकटे, बाडगव्हान, मुरमी, लाड़जळगाव, आधोडी, दिवटे, नागलवाड़ी, गायकवाड जळगाव आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने अशी मागणी शेवगाव कृषी उत्प्नन बाजार समितिचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी केली आहे. तसेच येत्या आठ दिवसात बालमटाकळी या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांसह तीव्र असा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील श्री, राजपुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. पुढे अधिक माहिती देताना ते म्हणाले की, चालू हंगामात कापूस पेरणीच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला व येन कापूस काढणीच्या वेळेस अतिवृष्टि झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कापूस बऱ्याच प्रमाणात वाया गेला आहे त्यामध्ये जो काही कापूस हातामध्ये येत आहे त्याला सुद्धा वेचनीसाठी मजूर दहा ते पंधरा रूपये किलो प्रमाणे भाव घेत आहे. परंतु सी.सी.आय. कापूस खरेदी केंद्र किंवा फेडरेशन सुरु झाल्यास शेतकऱ्यांच्या हातामध्ये शासकीय हमी भावाप्रमाणे आठ हजार रूपये याप्रमाणे भाव मिळेल व जे काही प्रमाणात पीक हातामध्ये आलेले आहे त्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागून दिलासा मिळेल त्यामुळे बालमटाकळीमध्ये तातडीने सी सी आय कापूस खरेदी केंद्र किंवा फेडरेशन सुरु करावे अशी प्रमुख मागणी या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने शेवगाव कृषी उत्प्नन बाजार समितिचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी केली आहे.
बातमी चौकट :-
शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात जागोजागी पथारी मांडून बसलेल्या काही व्यापाऱ्याकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु असून कापसाचा दर निश्चित करताना काही व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना तुच्छतेच्या वागणूक मिळत आहे. तसेच व्यापारी देखील कमी भावाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करुण एक प्रकारची शेतकऱ्यांची लूट करीत असल्याच्या तक्रारी आहेत तसेच काही व्यापारी मनमानी पद्धतीने कापूस खरेदी करताना मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे







