जळगाव, दि. 07 जुलै 2025: रोजी भारतीय बौद्ध महासभेची जळगाव पूर्व जिल्हा शाखेची सभा आज, रविवार रोजी यशवंत भवन, जळगाव येथे दुपारी 2:00 वाजता जिल्हाध्यक्ष आद. आर. एन. वानखेडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली तसेच नवीन नियुक्त्यांचा आणि निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या प्रारंभी जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी 01 जुलै 2023 ते 30 जून 2025 या कालावधीतील जिल्हा शाखेचा जमाखर्च अहवाल सभेपुढे वाचून दाखवला. हा अहवाल सर्वानुमते योग्य आणि बरोबर असल्याचे मान्य करून सभेने त्यास मंजुरी दिली. त्यानंतर अजेंड्यावरील सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली. उपस्थित जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी आयत्यावेळी सुचवलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून, त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे ठरले.
सभेच्या विशेष आकर्षण ठरलेल्या सत्कार समारंभात जळगाव पूर्व जिल्हा शाखेच्या पर्यटन विभागाचे सचिव प्रा. डॉ. संजीव साळवे यांची मुक्ताईनगर येथील जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी झालेल्या नियुक्तीबद्दल जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच, जामनेर तालुका शाखेचे नूतन अध्यक्ष चंद्रकांत मन्साराम इंगळे आणि रावेर तालुका शाखेचे अध्यक्ष विजय भोसले यांचा नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. या सत्काराने सभेचा उत्साह द्विगुणित झाला.
सभेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले. सभा मैत्रीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली असून, सभेच्या शेवटी सर्वांनी सूर नत्तयं करत सभेची सांगता केली.
या सभेने जिल्हा शाखेच्या कार्याला नवीन दिशा मिळाली असून, पुढील काळातही असेच सकारात्मक आणि प्रगतीशील कार्य सुरू राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सभेला ए. टी. सूरडकर, प्रकाश सरदार, युवराज नरवाडे, संजय साळवे, सुभाष सपकाळे, विजय अवसरमल, शैलेंद्र जाधव, विनोद रंधे, संतोष गायकवाड, संघरत्न दामोदर, विजय भोसले, पंडित सपकाळे, रवींद्र मोरे, चंद्रकांत इंगळे, दशरथ संध्यान, युवराज तायडे यांच्यासह जिल्ह्यातील तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.