
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये दिनांक 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या हिवाळी अधिवेशनात जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या
घोटाळ्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित होणार असल्याची शक्यता गृहीत धरून या देवस्थानच्या घोटाळ्याप्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर विभागाने दोघा जणांना अटक केली. संजय तुळशीराम पवार आणि सचिन अशोक शेटे अशी त्या दोघांची नावं असून त्या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायबर विभागाच्या या कारवाईमुळे अनेकांना मात्र चांगलीच धडकी भरली आहे. आपलं नाव या घोटाळ्यात येतं की काय, आपल्या मुलाला त्रास होऊ शकतो की काय, अशा शंकांकुशंकांनी अनेकांची झोप उडाली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले हे दोघे तर फक्त ‘हिमनगा’चंच टोक आहेत. या कारवाईनंतर अहिल्यानगरचे पोलीस त्या ‘हिमनगा’पर्यंत खरंच पोहोचतील का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस
यांनी शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये दीड हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान केला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे
यांनीसुद्धा काहींनी शनिदेवाच्या झोळीत हात घालून लूट केल्याचं वक्तव्य प्रसार माध्यमांशी बोलताना केलं होतं. नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे
यांनीदेखील आमदार सुरेश अण्णा धस यांच्या सुरात सूर मिळवला होता. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या घोटाळ्यासंदर्भातला चौकशी अहवाल सभागृहात वाचून दाखवला होता. त्यानंतरच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचं समोर आलं.
सुमारे दीड महिन्यापूर्वी अहिल्यानगरचे एस. पी. सोमनाथ घार्गे यांनी दोन व्यक्तींच्या खात्यावर एक कोटी रुपये आल्याचे पत्रकारांना सांगितलं होतं. मात्र त्या दोन व्यक्तींची नावे त्यांनी जाहीर केली नव्हती. त्यामुळे ज्यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपये आले, त्या व्यक्ती नक्की कोण, असा प्रश्न शनिभक्तांना पडला होता. परंतु दिनांक 4 डिसेंबर रोजी सायबर विभागाने दोघांना अटक केली आणि शनिभक्तांच्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. सायबर विभागाच्या या कारवाईचं सर्वत्र स्वागत करण्यात येत असलं तरी या देवस्थानमध्ये झालेला घोटाळा नक्की किती हजार कोटी रुपयांचा आहे, या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ नक्की कोण आहे, कोणाच्या आदेशानुसार हा घोटाळा झाला, हा घोटाळा करणाऱ्या संबंधितांना कोणाचं अभय होतं, या घोटाळ्याचं ‘कनेक्शन’ आणखी कुठवर आहे, या प्रश्नाची उत्तर पोलिसांकडून अपेक्षित आहेत. त्यामुळेच पोलीस या कारवाईनंतर थेट ‘हिमनगा’पर्यंत खरंच पोहोचतील का, असादेखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.
राजकीय दबावविरहित तपासाचीच शनिभक्तांना अपेक्षा…!
ज्या गावात शनिदेवाच्या कृपेमुळे चोरी होत नसल्याची वदंता आहे, चोरी करणारा चोर भ्रष्ट होतो, अशीही ज्या गावच्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे, त्या शनिशिंगणापूरमध्ये असलेल्या शनेश्वर देवस्थानअंतर्गत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा व्हावा आणि सामान्य कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल एक कोटी रुपये वळविण्यात यावेत, यापेक्षा दुसरं कुठलंच दुर्दैव या गावच्या ग्रामस्थांचं आणि शनिभक्तांचं नाही, असंच म्हणावं लागेल. सायबर विभागानं अटक केलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कोट्यवधी रुपये खर्च असलेल्या बंगल्याचं काम हादेखील नेवाशातल्या शनिभक्तांचा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळेच या मोठ्या घोटाळ्याचा तपास निष्पक्ष आणि राजकीय दबावविरहित व्हायला हवा, अशी अपेक्षा शनिभक्तांमधून व्यक्त केली जात आहे
खोबरे खरेदी आणि तेल विक्रीतही घोटाळा…?
सुमारे पाच लाख रुपये खर्चाच्या पुढील खरेदी आणि विक्रीसाठी निविदा मागविण्यात याव्यात, असा नियम आहे. अर्थात या नियमाचं पालन शनिशिंगणापूर देवस्थानचे सध्याचे अधिकारी आणि कर्मचारी करत असले तरी ही निविदा शंकास्पद असल्याचं बोललं जात आहे. खोबरे खरेदीसाठी मागविण्यात आलेली निविदा यासाठी बोलकं उदाहरण आहे, असंच म्हणावं लागेल. कारण यासाठी एका व्यापाऱ्याने 330 रुपये दराची निविदा भरली असता प्रशासनाने ती मान्य न करता 329 रुपये दराची निविदा मान्य करुन शनिशिंगणापूर देवस्थानचं खूप मोठं आर्थिक हित जोपासलं असल्याचा आव आणला. परंतू प्रश्न हा आहे, की 329 रुपये दराची निविदा भरणाऱ्या संस्थेला एका व्यापाऱ्याने 330 रुपये दराची निविदा भरली असल्याचं नक्की कसं समजलं, हे मात्र न उलगडणार मोठं कोडं आहे. या देवस्थानच्या तेल खरेदीतही मोठा घोटाळा असून अहिल्यानगरच्या ठराविक एकाच व्यापाऱ्याचीच निविदा कशी काय मंजूर केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात असून तेल आणि बर्फीच्या अनुक्रमे खरेदी – विक्रीच्या प्रक्रियेत घोटाळा असल्याचा अनेकांना संशय आहे







