
उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी यावल–बोरावल दरम्यान घडलेल्या तुषार चंद्रकांत तायडे (वय 18, समतानगर, जळगाव) या तरुणाच्या अमानुष हत्येप्रकरणी अद्यापही एक संशयित आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच घटनेमागील प्रमुख सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात आज मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) यांना निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाने सांगितले की तुषार तायडे याला लाथा, बुक्के आणि काठ्यांनी मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात यावल पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असली तरी एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याला त्वरित अटक करून मृत तुषार आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
अन्यथा रिपब्लिकन सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, ललित घोगले, राहुल सुरवाडे, मेजर मकासरे, अक्षय बारी, संघदिप महाले, मोहसीन पिंजारी, शुभम सोनवणे, अक्षय लोखंडे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







