
अहिल्यानगर (प्रशांत बाफना):-अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे, कारवाई सुरू असताना एक पोलीस कर्मचारी चकवा देऊन पसार झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,एका अपघातग्रस्त वाहनाची सुटका करण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल अभय लबडे आणि पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप यांनी वाहन मालकाकडे पैशांची मागणी केली होती.एकूण मागणी: १५,००० रुपये हप्ता तक्रारदाराने यापूर्वीच १०,००० रुपये दिले होते.
उर्वरित रक्कम: ५,००० रुपयांसाठी पोलिसांनी तगादा लावला होता.सततच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने अखेर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, नाशिकच्या पथकाने बुधवारी (दि.२९) दुपारी पाथर्डी पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.ठरल्याप्रमाणे तक्रारदार ५ हजार रुपये घेऊन पोहोचले.पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांवर झडप घातली.या कारवाई दरम्यान पथकाने एका कर्मचाऱ्याला जागीच ताब्यात घेतले,मात्र दुसरा कर्मचारी पोलिसांची नजर चुकवून घटना स्थळावरून पसार झाला.फरार कर्मचाऱ्याचा शोध सध्या सुरू आहे






