
उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
हत्तीरोग (फायलेरिया) निर्मूलनासाठी शासनाच्या हत्तीरोग दूरीकरण मोहिम २०२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना साकळी परिसरात मोठे यश मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “संक्रमण पडताळणी सर्वेक्षण – ३ (TAS-3)” यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणून Post Validation Surveillance (PVS) अंतर्गत दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र साकळीच्या कार्यक्षेत्रातील शिरसाड गावातील तडवी वाडा परिसरात हत्तीरोग सर्वेक्षण प्रभावीपणे पार पडले.
या सर्वेक्षण मोहिमेचे नियोजन मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व मा. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या आदेशानुसार करण्यात आले. तसेच मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी व वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मोहिम राबविण्यात आली.
यावेळी आरोग्य पर्यवेक्षक (प्र.) जितेंद्र चौधरी व आरोग्य निरीक्षक नितीन वाळुंज यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वेक्षणाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने केली. शिरसाड उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आसेमा परवीन नईमुद्दीन शेख व आरोग्य सेविका वृषाली पाटील यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
रक्त नमुना संकलनाची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य सेवक राजेश्वर निकुंभ यांनी पार पाडली. या मोहिमेत आशा कार्यकर्त्या सविता मिस्तरी, कोमल कोळी यांच्यासह ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी नितीन कोळी, शिपाई गणेश तायडे व आरोग्य सहकारी शरद धनगर यांनी मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे, आशा सेविकांच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्त तपासणीसाठी सहकार्य केले, ज्यामुळे सर्वेक्षण यशस्वी ठरले.
हत्तीरोग निर्मूलनाकडे ठोस पाऊल
TAS-3 यशानंतर PVS सर्वेक्षण यशस्वी होणे म्हणजे संबंधित परिसरात हत्तीरोग नियंत्रणात असल्याचे महत्त्वाचे संकेत मानले जातात. साकळी परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे भविष्यात हत्तीरोग पूर्णतः निर्मूलनाच्या दिशेने मोठी झेप घेतली जाणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
हत्तीरोगासारख्या गंभीर आजारापासून बचावासाठी नागरिकांनी वेळोवेळी होणाऱ्या सर्वेक्षण, तपासणी व औषधोपचार मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.







