
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जामखेड पोलिसांनी कडक पावले उचलत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला अटक करून त्याची शहरातील प्रमुख रस्त्यांवरून धिंड काढली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे.
अक्षय उर्फ चिंग्या मोरे याच्याविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दंगल, दरोडा, खंडणी तसेच आर्म्स अॅट अंतर्गत असे मिळून दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी शहरातील हॉटेल न्यू कावेरी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
मागील महिन्यात बीड रोडवरील एका हॉटेलवर चिंग्या मोरे याने आपल्या साथीदारांसह पिस्तूलातून गोळीबार करत फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हॉटेलमधील साहित्य तसेच चारचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी दि. ६ मार्च रोजी अक्षय उर्फ चिंग्या मोरे याला अटक केली. वाढत्या गुन्हेगारीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी सोमवारी (दि. ९) दुपारी त्याची जामखेड शहरातील रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.या कारवाईदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस नाईक जितेंद्र सरोदे,आकाश शेवाळे, गणेश काळाणे, कुलदीप घोळवे आणि गणेश भागडे हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.,
भाईगिरी करणार्यांना जेलची हवा
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी शहरात गुन्हेगारीला अजिबात थारा दिला जाणार नसल्याचे सांगत कोणताही गुन्हेगार अथवा स्वतःला ‘भाई’ समजणार्या गुंडांची येथून पुढे खैर केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे







