
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचाही गैरवापर झाल्याची चर्चा; आरोग्य विभागाने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावेत या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी या महत्त्वाच्या योजनांमध्ये जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. काही खासगी रुग्णालयांनी बोगस लाभार्थी दाखवून आणि कागदोपत्री उपचार दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनांतर्गत उपचार दाखवून काही रुग्णालयांनी प्रत्यक्षात रुग्ण नसताना कागदोपत्री बिलं सादर केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये एकाच रुग्णाच्या नावावर वेगवेगळ्या उपचारांचे बिल दाखवणे, मृत व्यक्तींच्या नावावर उपचार दाखवणे किंवा उपचार न करता निधी उचलणे अशा प्रकारांचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालये या योजनेत सहभागी असून त्यामधील काही रुग्णालयांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गरीब रुग्णांसाठी असलेल्या योजनांचा जर अशा प्रकारे गैरवापर होत असेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार असून यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात काही अधिकाऱ्यांचेही संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता प्रश्न असा उभा राहतो की, गरीबांच्या उपचारासाठी असलेल्या योजनांवर डल्ला मारणाऱ्या या “आरोग्य माफिया”वर प्रशासन कारवाई करणार का? की हा प्रकार कागदोपत्री चौकशीपुरताच मर्यादित राहणार?






