
भुसावळ | दि. २५ फेब्रुवारी २०२६:
रिपब्लिकन चळवळीत आपली आक्रमक आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिपब्लिकन सेनेची ताकद जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज, बुधवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता भुसावळ येथील शामा प्रसाद मुखर्जी गार्डन मध्ये आरपीआय (आठवले गट) चे माजी रावेर-यावल विधानसभा अध्यक्ष अशोक बोरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते
अशोक बोरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेचे उपरणे घालून पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश देण्यात आला. पक्षप्रवेश होताच अशोक बोरेकर यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांची रिपब्लिकन सेनेच्या ‘जिल्हा उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले की, “अशोक बोरेकर यांच्याकडे दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या येण्याने रावेर-यावल विधानसभा क्षेत्रात पक्षाला मोठी उभारी मिळाली आहे. रिपब्लिकन सेना वंचितांच्या प्रश्नांवरचा सर्वात मोठा दबावगट म्हणून काम करेल. येणाऱ्या काळात रावेर-यावलमधील प्रत्येक प्रश्नावर आम्ही आक्रमक लढा देऊ.”
अशोक बोरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे कणखर नेतृत्व, प्रगल्भ विचारधारा आणि जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांचे कार्य पाहून मी हा निर्णय घेतला आहे. पक्षाने माझ्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची जी जबाबदारी सोपवली आहे, तिला पूर्ण न्याय देऊन यावल आणि रावेर तालुक्यातील शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे.”
याप्रसंगी जिल्हा नेते दिनेश इखारे, जिल्हा महासचिव अरुण तायडे, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, राजेंद्र बारी, IT सेल प्रमुख स्वप्नील सोनवणे, बंटी नरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष लिलाधर सपकाळे, रमेश खंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकाश भालेराव, संदिप पारधे, विशाल गजरे, प्रकाश पारधे, नितीन बोरेकर यांनी पक्षप्रवेश केला







