
उपसंपादक : मिलिंद जंजाळे
दुसखेडा : दुसखेडा पेपर मिल स्टेशन परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून ग्रामपंचायतीच्या अक्षम व निष्क्रिय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात पाणीपुरवठा अनियमित असून काही भागात अनेक दिवस नळ कोरडे आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना भटकंती करावी लागणे ही ग्रामपंचायतीच्या कामकाजावर मोठी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे.
या समस्येमुळे परिसरातील अनेक महिला वारंवार यावल पंचायत समिती येथे गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. मात्र गट विकास अधिकारी वारंवार जळगाव येथे बैठकीसाठी गेल्याने महिलांना त्यांची भेट होऊ शकली नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक वाढला आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याऐवजी केवळ आश्वासनांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
विशेष म्हणजे, पेपर मिल स्टेशन परिसरात लोकसंख्या वाढत असताना पाणीपुरवठा यंत्रणेचा विस्तार करण्यात आलेला नाही. जुन्या लाईन, कमी दाब आणि नियोजनाचा अभाव यामुळे समस्या अधिक गंभीर बनल्याचे नागरिक सांगतात.
नागरिकांचा सवाल आहे की, कर वसुली वेळेवर केली जाते, मात्र मूलभूत सुविधा देताना ग्रामपंचायत का अपयशी ठरत आहे? प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेकडे होत असलेले दुर्लक्ष आता नागरिक सहन करणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.







