
बीड: /प्रशांत बाफना माजलगाव शहरातील वर्दळीच्या परिसरात सोमवारी (दि.23) भरदुपारी घडलेल्या धक्कादाय घटनेत दोन बहिणींना जबरदस्तीने चारचाकीत टाकून अपहरणाच प्रयत्न करण्यता आला. प्रसंगावधान राखत नागरिकांनी तत्काळ पाठलाग करुन संशयितांची कार आडवून दोन्ही तरुणींना सुरक्षित बाहेर काढले. तिन्ही संशयितांना वाहनासह पोलिसांच्या स्वाधीन केले. केज तालुक्यातीली एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणार्या अल्पयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचाराची घटना समोर आली आहे. अवघ्या 24 तासांत या घटना समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबाजोाई तालुक्यातील दोन बहिणी उपचारसाठी माजलगाव येथे आल्या होत्या. दवाखान्यातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या बाहेर येताच पांढर्या रंगाची चारचाकी त्यांच्या जवळ येऊन थांबली. वाहनातील एका युवकाने दरवाजा उघडून एका तरुणीला जबरदस्तीने आत ओढले. त्यानंतर इतर दोघांनी दुसर्या तरुणीलाही जबरदस्तीने कारमध्ये बसवून दरवाजे लॉक केले आणि वाहन वेगाने धारूर रोडच्या दिशेने निघाले.
घटनेदरम्यान कारमधून सुरू झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष गेले. काहींनी तातडीने पाठलाग सुरू केला. दरम्यान, तरुणींसोबत आलेल्या नातेवाईकांनीही संशयित वाहनाचा माग काढत पाठलाग केला. नागरिकांच्या वेगवान हालचालींमुळे कार आंबेडकर चौक येथे अडवण्यात आली. जमलेल्या गर्दीने दोन्ही तरुणींना सुरक्षित बाहेर काढले. संशयितांना घटनास्थळी पकडून वाहनासह पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.
याप्रकरणातील आरोपींची नावे दिनेश पुरुषोत्तम देवकते (रा.येल्डा, ता. अंबोजोगाई), रवींद्र विभीषण निळे (रा. चौथे वाडी, ता. अंबोजोगाई) आणि मजरुह सिकंदर सय्यद (रा. चौथेवाडी , ता. आंबाजोगाई) अशी आहेत. तिघांविरुद्ध अपहरणाच्या प्रयत्नासंदर्भात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार समीर ताजोद्दीन शेख वय 20 रा. सुर्डी – सोनेसांगवी या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.
पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मोबाईल लोकेशनसह इतर पुरव्यांच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. रविवारी रात्री तो कळंब बस स्थानकावरुन पळून जाण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई अत्यंत जलदगतीने पार पडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने चौकशीत मुलीला केजकडे जाणार्या बसमध्ये बसविल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत केज बसस्थानकातून मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. पिडितेच्या जबाबानुसार, तिला गावाबाहेरील ज्वारीच्या शेतात नेऊन अत्याचार करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध पोक्सो तसेचे अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान अटक आरोपी समीर शेख यास सोमवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रथमिक सुनावणीनंतर आरोपीला 27 फेब्रूवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. माजलगाव येथील वर्दळीच्या ठिकाणाहून भरदुपारी दोन्ही बहिणींच्या अपहरणाचा प्रयत्न सजग नागरिकांमुळे फसला, तर दुसर्या घटनेतील अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्यात आला या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून बीडमध्ये कायद्याचा धाक आहे का, नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.







