
*शिरपूर विशेष प्रतिनिधी*
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि सर्वसामान्य जनतेवर होणारे हल्ले आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहेत. शिरपूर तालुक्यातील भावेर गावात सरपंचाच्या मनमानी कारभाराचा आणि गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सरपंचाने केलेले अनाधिकृत बांधकाम आणि त्याबद्दल जाब विचारणाऱ्या गावकऱ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण उजेडात आणण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार कोमल पाटील आणि प्राजक्ता तायडे यांना सरपंचाचे पती आणि मुलांनी धक्काबुक्की करत, जातीवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
भावेर गावातील सरपंचाने पदाचा दुरुपयोग करत अनाधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर कामाबद्दल जेव्हा स्थानिक गावकऱ्यांनी आवाज उठवला आणि जाब विचारला, तेव्हा लोकशाही मार्गाने उत्तर देण्याऐवजी सरपंचाचे पती आणि मुलांनी गावकऱ्यांना अमानुष मारहाण केली. या गंभीर प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आणि बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या पत्रकार कोमल पाटील आणि पत्रकार प्राजक्ता तायडे यांना कर्तव्य बजावत असताना आरोपींनी अडवले.
*महिला पत्रकारांचा अवमान आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा?*
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सरपंचाच्या पतीने आणि मुलांनी महिला पत्रकारांना अरेरावीची भाषा वापरली. केवळ अरेरावीच नाही, तर त्यांना धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ केली. एका महिला पत्रकाराला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि भररस्त्यात जातीवाचक बोलणे हे कायद्याने अत्यंत गंभीर गुन्हे आहेत.
या घटनेत आरोपींवर खालीलप्रमाणे कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य धोक्यात येऊ शकते:
१. *पत्रकार संरक्षण कायदा*
कर्तव्यावर असलेल्या पत्रकाराला मारहाण करणे किंवा धक्काबुक्की करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्यांतर्गत आरोपीला ३ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच, पत्रकाराच्या साहित्याचे नुकसान केल्यास त्याची भरपाई देखील द्यावी लागते.
२. *अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा* Atrocities Act
पत्रकारांना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास, आरोपीला तात्काळ अटक होऊ शकते आणि हा गुन्हा अजामीनपात्र आहे. यामध्ये ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची तरतूद आहे.
३. *भारतीय न्याय संहिता भा.द.वि. कलमे:*
महिलेचा विनयभंग किंवा तिच्याशी गैरवर्तन (धक्काबुक्की) केल्यास बीएनएस कलम ७४ (पूर्वीचे ३५४) अंतर्गत कठोर कारवाई होऊ शकते.
मारहाण आणि शिवीगाळ यासाठी बीएनएस कलम ११५ आणि ३५२ अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात.
४. *सरपंच पद रद्द होण्याची टांगती तलवार*
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार, सरपंचाने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी पदाचा गैरवापर केल्यास किंवा गैरवर्तणूक केल्यास संबंधित सरपंचाला अपात्र ठरवले जाऊ शकते आणि त्यांचे पद तात्काळ रद्द होऊ शकते.
ज्यांनी गावाचे रक्षण करायचे, त्यांनीच जर भक्षक बनून कायद्याचे धिंडवडे काढले तर सामान्य जनतेने कुणाकडे बघायचे? पोलीस प्रशासन या गुंडांवर, महिला पत्रकारांचा अवमान करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकणार का? हा प्रश्न आता संपूर्ण शिरपूर तालुक्यात विचारला जात आहे.







